चाळीशीतील महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग वाढतोय…

चाळीशीतील महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग वाढतोय…

२०१६ ते २०२१ या पाच वर्षात ४६५ महिलांना स्तनाचा कर्करोग असल्याचे निदान
एप्रिल २०२० ते जुलै २०२१ लॉकडाऊनच्या काळात ८० नवीन रूग्णांची नोंद
स्तनाचा कर्करोग टाळण्यासाठी वेळोवेळी मॅमोग्राम करा – डॉक्टरांचा सल्ला

मुंबई:-

महिलांमध्ये सर्वांधिक आढळून येणाऱ्या स्तनांचा कर्करोगात गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मुंबईतील एसीआय कम्बाला हिल हॉस्पिटलच्या आकडेवारीनुसार, २०१६ ते २०२१ या पाच वर्षात मुंबईत ४६५ महिलांना स्तनाचा कर्करोग झाल्याचे निदान करण्यात आले आहे. चाळीशीपार केलेल्या महिलांची संख्या यात जास्त असल्याचे पाहायला मिळत आहे. यात स्तनाच्या कर्करोगाने पिडीत असणाऱ्या ५० वयापेक्षा जास्त महिलांची संख्या २९५ इतकी आहे. यावरून स्तनाच्या कर्करोगाचा धोका महिलांमध्ये वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळतेय.
भारतात महिलांमध्ये प्रामुख्याने आढळून येणाऱ्या स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण सध्या प्रकर्षाने वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारतातील एकूण कॅन्सरग्रस्त महिलांच्या संख्येत ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण २५ ते ३० टक्के आहे.

नॅशनल कॅन्सर रजिस्ट्री प्रोग्राम (NCRP)

ने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, स्तनाचा कर्करोग भारतीय शहरांमध्ये विशेषत: दिल्ली, बेंगळुरू आणि चेन्नई सारख्या महानगरांमध्ये आरोग्याची एक मोठी चिंता बनली आहे. महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका अमेरिकेत आठ पैकी एक आहे, तर भारतात शहरी भागात ३० पैकी एक आणि ग्रामीण भागात ६० पैकी एक आहे. भारतातील तरुण स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग प्रत्यक्षात पाश्चिमात्य देशांपेक्षा चार पट अधिक आहे.
अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटल मुंबईचे ऑन्कोप्लास्टिक ब्रेस्ट सर्जन डॉ.संदीप बिपटे म्हणाले की, स्तनाची गाठ आढळून आली तरी बऱ्याचदा लाज वाटत असल्याने अनेक तरूण महिला डॉक्टरांकडे उपचारासाठी वेळेवर येत नाहीत. याच कारणांमुळे कर्करोगाचे निदान तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात होते. भारतात स्तनाच्या कर्करोगाचे उशीरा होण्याचे प्रमाण ५० टक्के इतके आहे.

डॉ. बिपटे

डॉ. बिपटे पुढे म्हणाले की, स्तनाच्या कर्करोगावर उपचारासाठी शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन आणि हार्मोनल थेरपी सारख्या अत्याधुनिक उपचार उपलब्ध आहेत. परंतु, कर्करोगावरील खर्च सर्वसामान्यांना परवडण्याजोगा नसल्याने अनेक महिला उपचार घेणं टाळतात. वेळीच उपचार न झाल्यास रूग्ण दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे, प्रत्येक महिलेने वयाच्या विशीनंतर स्तनाची नियमित तपासणी करून घेणे गरजेचं आहे. तर वयाच्या पन्नाशीनंतर प्रत्येकी दोन वर्षांनी मॅमोग्राफी करून घ्यावी. वेळीच स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाल्यास उपचार करणं शक्य होतं.

एसीआय कम्बाला हिल हॉस्पिटलचे सल्लागार सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जन डॉ. धैर्यशील सावंत म्हणाले की, एप्रिल २०२० ते जुलै २०२१ या वर्षात स्तनांच्या कर्करोगाची ८० नवीन प्रकरणं समोर आलेली आहेत. यातील नऊ रूग्ण ४० वयापेक्षा जास्त असून २३ रूग्ण ४१ ते ४९ वयोगटातील आहेत. तर उर्वरित ४८ रूग्ण पन्नाशीच्या पुढचे आहेत. २०१३ पासून आतापर्यंत स्तनाच्या कर्करोगाच्या ९०० पेक्षा जास्त रूग्णांवर उपचार केले आहेत. बदललेली जीवनशैली, प्रदूषण, चुकीचा आहार आणि आरोग्याकडे दुर्लक्ष ही यामागील मुख्य कारणं आहे. या आजारावर त्वरीत उपचार होत नसल्याने स्तनाच्या कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंचा आकडा वाढतोय.

मागील पाच वर्षांची स्तनाच्या कर्करोगाची आकडेवारी

• ऑगस्ट २०१६ ते जुलै २०२१ या वर्षातत एकूण ४६५ स्तनाच्या कर्करोगाचे रूग्ण आढळून आले आहेत.
• ४० वयापेक्षा जास्त ६० रूग्णांची नोंद
• ४१-४९ वयोगटातील ११० रूग्णांची नोंद
• ५० पेक्षा जास्त वयोगटातील २९५ रूग्णांवर उपचार करण्यात आले आहे.
डॉ. सावंत पुढे म्हणाले, स्तनाच्या कर्करोगाबद्दल अपुरी माहिती हे कर्करोगाचे उशीरा निदान होण्यामागील मुख्य कारणं आहे. म्हणून स्तनांमध्ये कोणताही बदल दिसून आल्यास त्वरीत वैद्यकीय सल्ला घ्यावा. वयाच्या पन्नाशीनंतर दर दोन वर्षीनी मॅमोग्राफी करण्याचा सल्ला दिला जातो. यात क्ष-किरणांच्या साह्याने स्तनांची तपासणी केली जाते. ही एक अत्यंत महत्त्वाची चाचणी मानली जाते. जेणेकरून स्तनाच्या कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास उपचार करणे सोपं होतं.

Leave a Comment